दिल्लीच्या ललित कला अकादमीत खान्देशातील चित्रकार

 दिल्लीच्या ललित कला अकादमीत खान्देशातील चित्रकार


चोपडा दि.१७(प्रतिनिधी) : दिल्ली येथील ललित कला अकादमीच्या गॅलरीत दि.२१ते२७ ऑक्टोबर या कालावधीत  खान्देशातील युवा चित्रकारांचे अंतरंगसाधत शीर्षक असलेले चित्र प्रदर्शन होत आहे या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार मनिषकुमार राव (नवी दिल्ली) यांच्या हस्ते होईल. या प्रदर्शनात चित्रकार जितेंद्र साळुंके,विरेंद्र सोनवणे,धनराज पाटील,लक्ष्मीकांत सोनवणे, महेंद्र पाटील यांची विविध शैलीतील नैसर्गिक,सामाजिक,विषयांची चित्रे आहेत.

या प्रदर्शनात..

 *जितेंद्र साळुंके* यांनी सामाजिक आशयाची काळया  शाईतील पेपर माध्यमातील रेषांचा  सृजनात्मक चित्र प्रवास रेखाटला आहे.कॅनव्हास वरील सामाजिक आशयातील घटकांना मूर्त-अमूर्त ने रेखाटून,फेस सेलर,ब्लू फिश,केटली,सनफ्लाॅवर विषयांची शीर्षक चित्रे प्रेक्षकांसमोर मांडतात.जितेंद्र साळुंके चोपडा येथील रहिवासी आहेत. त्यांची,विविध वाडःमयीन नियतकालिकांतून सृजन रेखाटने प्रकाशित होत असतात. 

   *विरेंद्र सोनवणे* यांनी माणसातील स्वभावचित्रण, प्राणी- पक्षी यांच्यातील हिंसकता,भित्रेपणा,लढाऊवृती अशा स्वभावांना विषयाला गडद करून कॅनव्हास आणि पेपर-काळ्याशाईच्या माध्यमातून रेखाटतात, विषय पूर्णत्वास नेतानां पक्षी हा काही चित्रात प्रतीक म्हणून वापरलेला आहे. सोनवणे हे हातेड (ता.चोपडा)येथील राहणारे असून ते मुंबई येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे.

  *धनराज पाटील* निसर्गातील मूर्त-अमूर्त आकारांचा,आपल्या कल्पक शैलीतून अवाढव्य पसरलेल्या निसर्ग सृष्टीला कोर्‍या कॅनव्हासवर साकारलेली चित्रे वेधक आहेत. पसरलेली वेली,पानांचे रेखाटन,सुकलेली जीर्ण पानांचे बारकाव्याने केलेली रेखाटने मानवी मनाला आल्हाददायक स्पर्श करतात.धनराज पाटील हे पारोळा येथील आहेत. ते कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे.

*लक्ष्मीकांत सोनवणे* माणसांच्या जीवनाचे चित्र कॅनव्हास तसेच काळया शाई या माध्यमात रेखाटलेली आहेत.काळया शाईतील सामाजिक आशयातील चित्रे वेधक ठरतात. जिवन जगत असतांना वाट्याला आलेले सुख-दुःखाचे चढउतार,आणि  अनुभवलेली माणसं,त्यांनी जीवन जगण्यासाठीची केलेली कसरत यांचे चित्र सोनवणे यांनी साकारलेली आहेत. लक्ष्मीकांत सोनवणे.हे विरवाडा (चोपडा) येथील असून ते शिंदखेडा येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहे.

*महेंद्र पाटील*  अ‍ॅक्रिलीक माध्यमातील सिटीस्केप मुंबईच्या  धावत्या जीवनाचे जगणं,शहरातील गगनचुंबी इमारती, ऐतिहासिक वास्तू, माणसांनी भरून वाहणारे रस्ते, मुंबईतील अरूंद गल्ली, सिटीस्केप मध्ये ऊन सावल्यांचा खेळ रंगातून टिपलेला आहे.रंगांच्या समायोजनाने हे चित्र वेधक आहेत.त्यांची काही रचनात्मक चित्र प्रदर्शनात आहेत.महेंद्र पाटील हे चुंचाळे(ता.चोपडा) येथील असून ते मुंबई येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे.

   हे प्रदर्शन ललित कला अकादमीच्या कलादालनात ११ते७ या वेळेत पाहता येईल.या चित्रकारांची जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई,पु.ना.गाडगीळ आर्ट गॅलरी,जळगांव.राजारवि वर्मा आर्ट गॅलरी पुणे,नंतरचे हे चौथे चित्र प्रदर्शन दिल्लीच्या ललित कला अकादमीत होत आहे. या प्रदर्शनासाठी कला,साहित्य, सामाजिक.क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने