अडावदला पोलिसांच्या चोख बंदोबस्तात ’श्री’ विसर्जन शांततेत.. महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे अंधारात "बाप्पा"ला निरोप

 अडावदला पोलिसांच्या चोख बंदोबस्तात ’श्री’ विसर्जन शांततेत.. महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे  अंधारात "बाप्पा"ला निरोप 


अडावद ता. चोपडा दि.(विशेष प्रतिनिधी) येथील श्री विसर्जन सातव्या दिवशी झाले. मात्र या विसर्जन मिरवणुकीचा आनंद विजेअभावी नागरिकांना घेता आले नाही. संपूर्ण गावात केबल मंजूर झालेली आहे. मात्र महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे ती मुख्य रस्त्यावर टाकण्यात आली नाही. त्यामुळे संपूर्ण गावात वीज बंद करून अंधारात मिरवणूक काढण्याची वेळ आली. मात्र पोलिसांनी ठेवलेल्या अभूतपूर्व चोख बंदोबस्ताने मिरवणूक शांततेत पार पडली.

        सातव्या दिवशी दुपारी चार वाजता श्री विसर्जन मिरवणूक सुरू झाली यात महर्षी वाल्मिक गणेश मित्र मंडळ, दोस्ती गृप गणेश मित्र मंडळ, शिवशक्ती ग्रुप गणेश मित्र मंडळ, रायबा गृप गणेश मित्र मंडळ, महात्मा फुले गणेश मित्र मंडळ, जागेश्वर जीर्णोद्धार गणेश मित्र मंडळ, बालाजी गणेश मित्र मंडळ, त्रिमूर्ती गणेश मित्र मंडळ, साई गृप गणेश मित्र मंडळ, पंचवृक्ष (सह्याद्री) गणेश मित्र मंडळ या गणेश मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता.

     महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे रात्री एक वाजेपर्यंत संपूर्ण चाळीस हजार लोकवस्तीचे गाव अंधारात बुडाले होते. विसर्जन मिरवणूक मात्र सुरू होती. पूर्ण गावात केबल टाकण्यासाठी मंजूर झाली आहे. गेल्या चार महिन्यात फक्त एकाच ती टाकण्यात आली. यावर्षी जास्त उंचीच्या गणेशमूर्ती आहेत. विसर्जन मिरवणूक काढण्यासाठी तारांचा अडथळा निर्माण होईल म्हणून आधी मिरवणूक मार्गावर केबल टाकण्यात यावी अशी सुचना गणेशोत्सव सुरू होण्या अगोदर  ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाने महावितरणला केली होती. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या सूचनेकडे साफ दुर्लक्ष केले परिणामी गणेश भक्तांना अंधारात मिरवणूक पार पडावी लागली. याचा त्रास मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या लहान मुले, युवती, महिला व वृद्धांना अधिक झाला.     

      अडावद हे संवेदनशील गावात तब्बल सात तास अंधारात मिरवणूक काढण्यात आल्याने अशा अंधाराचा फायदा घेत अनुचित प्रकार घडण्याचे धोके असतात. हे प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने ड्रोनद्वारे पाहणी करण्यासाठी ड्रोन मागवले होते. पण रात्रीच्या अंधारामुळे समाजकंटकांवर नजर ठेवण्याची यंत्रणा कुचकामी ठरली. याचे गांभीर्य संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना नाही. सर्व परिस्थितीची जाणीव असतांनाही अधिकाऱ्यांच्या ढिसाळ व नियोजनशून्य कामामुळे गणेश भक्तांना अंधारात चाचपडत मिरवणूक पार पाडावी लागली.

      चोख बंदोबस्तामुळे मिरवणूक शांततेत 

      उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली अडावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी मिरवणूक बंदोबस्तासाठी चोपडा शहर, चोपडा ग्रामीण, जळगांव शहर, जिल्हापेठ, जळगांव तालुका, एमआयडीसी जळगांव या पोलीस ठाण्यातून तसेच शहर वाहतूक शाखेचे असे पन्नास पोलिस, नव्वद गृहरक्षक दलाचे जवान, जिल्हा नियंत्रण कक्षातील राखीव पोलीस पथक असा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी लावल्याने मिरवणूक शांततेत संपन्न झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने