रक्तदानातून विश्वबंधुत्वाचा संदेश... ब्रह्माकुमारीज रक्तदान महाअभियान.. चोपडा ओम शांती केंद्रात 33 बाटल्यांचे रक्त संकलन
चोपडा दि.२६(प्रतिनिधी) प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय अर्थात ओम शांती परिवाराच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या अठराव्या पुण्यतिथी व विश्वबंधुत्व दिनानिमित्त सोमवार, दि. २५ ऑगस्ट रोजी देशभरात भव्य रक्तदान महाअभियानाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमास देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून जवळपास एक लाख रक्तदात्यांनी रक्तदान केले असून या विक्रमी उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात येणार आहे.
चोपडा येथील ओम शांती कॉलनीतील ओम शांती केंद्रात ओम शांती परिवार व रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात ३३ हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. “सामाजिक उपक्रमांचा गजर न करता कर्म व कर्तृत्वाचा जागर व्हावा. रक्तदानासारख्या महान कार्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे,” असे मत यावेळी चोपडा ओम शांती केंद्राच्या संचालिका मंगलादीदी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी चोपडा ओम शांती केंद्राच्या संचालिका मंगला दीदी, सारिका दीदी, करिश्मा दीदी, शीतल दीदी, राजेश शर्मा, शांताराम भाई, राजू अण्णा तसेच रोटरी क्लब ऑफ चोपडाचे पंकज बोरोले, आशिष गुजराथी, चंद्रशेखर भाई, नितीन जयस्वाल यांसह सोशल सर्विस विंगचे चेअरमन प्रवीण गुजराथी, डॉ. सुनील देशपांडे, डॉ. किरण लोहार, लॅब टेक्निशियन सुनील माळी, विद्या श्रीसुंदर, आशालता शेटे व शितल माळी आदींनी परिश्रम घेतले.
ओम शांती केंद्र, माउंट अबूच्या पुढाकाराने भारत व नेपाळात आयोजित या महाअभियानात संकलित रक्ताच्या लाखो बाटल्या जीव वाचविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. “रक्तदान हेच खरे जीवनदान” या संदेशाने देशभरातील रक्तदात्यांनी एकात्मतेचा सुंदर नमुना दिला आहे.