दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे धरणगाव येथे भावनिक प्रतिपादन
धरणगाव / जळगाव दि. २७ जुलै (प्रतिनिधी) – “दिव्यांगांना पूर्वी संजय गांधी निराधार योजनेतून मिळणारी केवळ 1000 रुपयांची मदत आता वाढवून दरमहा 2500 रुपये करण्यात आली आहे. ही मदत केवळ आर्थिक सहाय्य नसून, दिव्यांगांच्या आत्मसन्मानाची आणि स्वाभिमानाची पावती आहे. “दिव्यांग व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात मागे राहू नयेत, त्यांच्या जीवनातही उजाळा यावा, यासाठी मी पालकमंत्री म्हणून सातत्याने प्रयत्नशील आहे. याच भावनेतून जिल्हा वार्षिक नियोजन (डीपीडीसी) मधील १ टक्के निधी, म्हणजेच तब्बल ७ कोटींहून अधिक रक्कम, दिव्यांग सक्षमीकरणासाठी राखीव ठेवली आहे. “दिव्यांग बांधवांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा असून दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. त्यांच्या जीवनात आत्मनिर्भरता आणि सन्मान यांची भर घालणे हीच खरी सामाजिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १२ दिव्यांग बांधवांना बॅटरीवर चालणाऱ्या तीनचाकी सायकल्स, २०० पेक्षा जास्त दिव्यांग महिलांना साड्यांचे वाटप, तर ५० दिव्यांग बांधवांना रेशनकार्डचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, मुख्याधिकारी रामविलास झवर, आणि गटविकास अधिकारी किशोर वानखेडे यांचा अपंग महासंघातर्फे पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी दिव्यांग निधी वेळेत खर्च करून, दिव्यांग बांधवांना अमूल्य सहकार्य केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पाटील सर यांनी केले. अपंग महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश आणि माहिती सविस्तरपणे मांडली. शहराध्यक्ष रवींद्र काबरा यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, मुख्याधिकारी रामनिवास झवर, गटविकास अधिकारी किशोर वानखेडे, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, पोलीस निरीक्षक संतोष पवार आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच अपंग महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, शहराध्यक्ष रवींद्र काबरा , रमेश चौधरी, बाबूलाल पटेल, प्रमोद सुतार, तसेच शिवसेना शहरप्रमुख विलास महाजन, विजय महाजन, धीरेंद्र पूर्भे, बुट्या पाटील, पप्पू भावे, वाल्मिक पाटील, दीपक पाटील, हेमंत चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह तालुक्यातील दिव्यांग बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.