नरेंद्रला विवेकानंद बनवण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्येच : प्रा मिलिंद जोशी
♦️प्रताप विद्या मंदिराचा शतकोत्तर सातवा वर्धापन दिन उत्साहात साजरा
चोपडा,दि.९ (प्रतिनिधी )21व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे असताना तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञानाचा मिलाप केला तरच आजच्या युगाला साजेसा विद्यार्थी तयार करता येईल. असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी प्रताप विद्या मंदिराच्या शतकोत्तर सातव्या वर्धापन दिनाच्या समारोपप्रसंगी केले. पुढे ते म्हणाले की, तंत्रज्ञान हे वापरण्यासाठी असते तर माणसे प्रेम करण्यासाठी असतात पण आज मात्र तंत्रज्ञानावर प्रेम केले जाते तर माणसांचा फक्त वापरण्यासाठी उपयोग केला जातो अशी उलट परिस्थिती होताना दिसते आहे. तंत्रज्ञानाचा वापर करत असताना केवळ लाईक आणि दुसऱ्याचे अभिप्राय यावर स्वतःचे सुख शोधणाऱ्यांना सत्व आणि स्वत्व उरत नाही. आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि कृतिशीलतेला वाव द्यावा. कारण नेहमीच्या मळलेल्या वाटांनी जाणारे मोठे ध्येय गाठू शकत नाहीत. शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांना भावनिक श्रीमंती प्रदान करण्यावर भर द्यावा. नरेंद्रला विवेकानंद बनवण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्येच असते. सर्जनशीलता, कृतिशीलता, प्रयोगशीलता आणि नाविन्यता या चतुसूत्रीवर शिक्षकांनी कार्य करणे आवश्यक आहे.
यावेळी व्यासपीठावर चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, चेअरमन राजाभाई मयूर, सचिव माधुरीताई मयूर, कार्यकारिणी सदस्य चंद्रहासभाई गुजराथी ,भूपेंद्र भाई गुजराथी, रमेश जैन तसेच प्रवीण भाई गुजराथी, किरण भाई गुजराथी,आर बी गुजराथी, डॉ विकास हरताळकर यांच्या समवेत संस्थेला सढळ हाताने आर्थिक मदत करणाऱ्या रमेशकाका जैन, ए जी कुलकर्णी, एस पी बऱ्हाटे, एम बी चौधरी, पी पी पाटील, सुनील गुजराथी, मुरली गुजराथी, प्रवीण गाडीलोहार, दिलीप पाटील, आर आर शिंदे,प्रल्हाद पाटील, डी एस पाटील, अमृत पारधी, अरुण पाटील, गेमेंद्र लोहाणा, दीपक महाजन आधी देणगीदार उपस्थित होते. संस्थेच्या सर्व विद्या शाखांच्या विद्यार्थ्यांची तोंड गोड करणाऱ्या जीवन चौधरी आणि माझी नगराध्यक्ष मनीषा चौधरी यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या सर्व देणगीदारांचा सन्मान करण्यात आला.
आपल्या प्रास्ताविकातून संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर यांनी संस्थेच्या विविध विद्याशाखांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले उत्तुंग यश, शिक्षकांनी प्राप्त केलेले पुरस्कार आणि त्यांची कामगिरी याविषयी त्यांनी गौरवोद्गार काढले.
यावेळी दहावीच्या शालांत परीक्षेत विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या दिव्या गजानन पाटील हिचा उमा सुवर्णपदक देऊन सन्मान करण्यात आला.प्रताप प्रज्ञाशोध परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या हर्ष राहुल पाटील, टिळक महाराष्ट्र विद्यापीठात इंग्रजी परीक्षेत विद्यापीठातून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या स्पर्श डीगंबर पाटील, विद्याप्रभा पुरस्कार प्राप्त आरोही मिलिंद पाटील, विद्या तेजस पुरस्कार प्राप्त तेजस किशोर पाटील, रंगोत्सव स्पर्धेतील राष्ट्रीय पारितोषिक विजेता सिद्धार्थ मनोज राठोड आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने ऑलिंपिक विश्व: किमया खेळाडूंची या विषयावर तयार करण्यात आलेल्या हस्तलिखिताचे विमोचन यावेळी करण्यात आले.
............................................................................
स्व संध्याताई मयूर प्रज्ञावंत शिक्षक पुरस्कार प्रदान
यावेळी स्व संध्याताई मयूर प्रज्ञावंत शिक्षक पुरस्काराने पूर्वप्राथमिक विभागाच्या मीनाक्षी वसाणे यांना गौरवण्यात आले. मयूर परिवाराच्या वतीने विजेत्याला स्मृतीचिन्ह आणि रोख 11000 रुपये पारितोषिक दिले गेले.
..............................................................................
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही ए गोसावी, योगिता बोरसे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक पी एस गुजराथी यांनी केले. पी बी कोळी, पी ए नागपुरे आणि त्यांच्या गानचमूने ईशस्तवन व शालेय गीत सादर केले तर उपमुख्याध्यापक पी डी पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. फलक लेखन कमलेश गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या सर्व विद्या शाखांचे प्रमुख, समन्वयक गोविंदभाई गुजराथी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी प्रयत्न केले. यावेळी आजी-माजी पदाधिकारी शिक्षक बंधू भगिनी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.