जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघात जनजागृतीसाठी व्हॉइस ऑफ मीडिया कडून फिरणार चित्र रथ ; जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दाखविला झेंडा
जळगाव दि. 5 ((प्रतिनिधी)) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यात मतदारांमध्ये जनजागृती करण्यासोबतच अधिकाधिक मतदाराना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याकरिता व्हॉईस ऑफ मीडिया यांच्या वतीने अमळनेर येथील मंगळग्रह संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या मतदार जनजागृती रथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांचे हस्ते दि.5 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात करण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी,अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील,मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष , विश्वस्त आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थितांच्या हस्ते मतदार जनजागृती रथाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यात 36 लाखापेक्षा अधिक मतदार संख्या आहे. लोकसंख्येच्या मानाने सार्वत्रिक निवडणूकांमध्ये होणारे मतदान पहाता कमी असते. घटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला असला तरी बहुतांश मतदार मतदान हक्क बजावण्यासाठी पुढे येत नाहीत. आपले मत बहुमूल्य असून मतदानाचा हक्क बजावावा यासाठी स्वयंसेवी संस्था, संघटनांनी मतदान जनजागृतीसाठी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी केले.