वाचनाची सवय आपल्याला समृध्द बनविते - गौरव महाले
चोपडा दि.16(प्रतिनिधी )- पुस्तकाचा स्पर्श झालेली व्यक्ती कधीही चोरी किंवा वाईट काम करु शकत नाही. पुस्तके, ग्रंथ आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. वाचनाची सवय आपल्याला समृध्द बनवत असते, असे सांगत शारदा मॅथ्स क्लासेसचे संचालक गौरव महाले यांनी महावाचन महोत्सवात सहभागी महिला मंडळ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी गौरव महाले यांनी स्व. रतन टाटा यांच्या जीवनातील वाचनाचे महत्व दर्शविणारा प्रसंग व प्रसंगानुरुप गोष्टी सांगत उपस्थितांशी संवाद साधला.
नगर वाचन मंदिरात भारतरत्न स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती - वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष आशिष गुजराथी, उपाध्यक्ष प्रा. एस. टी. कुलकर्णी, कार्यवाह गोविंद गुजराथी, महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील हे उपस्थित होते.
यावेळी महिला मंडळ माध्यमिक विद्यालयातील पीयुष बारी, उन्नती गुजराथी व आम्रपाली पवार या विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकात त्यांना काय भावले ते उपस्थितांसमोर मांडले. तर प्रा. एस टी कुलकर्णी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर काय काय बदल होतील व आपली काय जबाबदारी असेल याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी स्वलिखित शब्द ब्रम्ह हा काव्य संग्रह नगर वाचन मंदिराला भेट दिला.
प्रास्ताविकात आशिष गुजराथी यांनी महिला मंडळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी महावाचन महोत्सवात उल्लेखनीय सहभाग नोंदविल्याबद्दल शाळेचे आभिनंदन केले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बक्षीस रुपात देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद गुजराथी यांनी तर आभारप्रदर्शन विलास पाटील यांनी केले. कार्यक्रमास नगर वाचन मंदिराचे संचालक संजीव गुजराथी, विलास पाटील, धिरेंद्र जैन, स्नेहल पोतदार, प्रफुल्ल गुजराथी, श्रीकांत नेवे यांच्यासह महिला मंडळ शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व गावातील नागरिक उपस्थित होते.