चोपडा रोटरी तर्फे उत्तमनगर पाड्यावर दिवाळी फराळ वाटप
चोपडा दि.८(प्रतिनिधी)- 'खुशियों का कोई पल नही होता, हर पल में खुशियां होती है....' या ओळी जीवनात आनंदाचे महत्त्व आणि त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन सांगण्यासाठी पुरेशा आहेत. जीवनातला आनंद कुठे आहे? कसा आहे? याच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. दुःखीतांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसण्यातही आनंद आहे. तर गरजवंताला केलेली मदत देखील आनंद देऊन जाते. आपल्या आनंदात दुसऱ्यांना सहभागी करणे, हा देखील आनंदच आहे. जीवनातील असे आनंदाचे क्षण वेचता येणे हाच खरा मानवता धर्म होय. याच मानवता धर्माची जाणीव ठेवत 'क्रिएट होप इन द वर्ल्ड' या आपल्या विचाराशी नाळ कायम ठेवत येथील रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या सदस्यांनी आदिवासी पाड्यावरील बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करून आनंदाचे क्षण आपल्या खात्यात जमा केले आहेत.
'खुशियां हर पल' या आपल्या प्रकल्पा अंतर्गत येथील रोटरी क्लबच्या सदस्यांनी यथाशक्ती योगदान देत तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील उत्तमनगर या पाड्यावर दीडशे कुटुंबांना दिवाळीच्या फराळाचे वाटप केले. अल्प कालावधीत सुमारे ३० हजारापेक्षा अधिक रक्कम या सदस्यांनी गोळा करत सोमवारी सकाळी उत्तमनगर येथे या दिवाळी फराळाच्या पाकिटांचे प्रत्येक झोपडी आणि घरात जाऊन वाटप केले. यावेळी तेथील लहान बालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद उपस्थितांना समाधान देऊन गेले.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे. चेतन टाटिया, सचिव रोटे. अर्पित अग्रवाल, प्रोजेक्ट चेअरमन रोटे. अरुण सपकाळे यांच्यासह पंकज बोरोले, नितिन आहिराव, प्रविण मिस्त्री, सुरेखा मिस्त्री,लीना पाटील,नयन महाजन , स्वप्नील महाजन, हे रोटेरीयंस उपस्थित होते.
