प्राचार्य डॉ प्रकाश लोहार यांना दोन संस्थाचा जीवन गौरव पुरस्कार
नंदुरबार दि.२३(प्रतिनिधी)अक्कलकुवा येथील विद्या विकास संस्थेचे कला व विज्ञान महाविद्यालय, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन प्रबोधिनी, मुबई व पीजीआरआय लमपांग विद्यापीठ, इंडोनेशिया यांच्या संयुक्त विद्यमाने नंदूरबार येथे दिनांक २० व २१ ऑक्टोबर दरम्यान आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत स्थानिक ते आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात समर्पित व निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे कार्यकरून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या प्राचार्य डॉ प्रकाश लोहार यांना राजपिपला गुजरात येथील बिरसा मुंडा आदिवासी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा मधूकरभाई पाडवी, खंडवा येथील वरिष्ठ साहित्यिक प्रा श्रीराम परिहार, निजामपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ खैरनार, धुळे येथील एस एस व्ही पी एस कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मनोहर पाटील, जी टी पी महाविद्यालय, नंदूरबारचे प्राचार्य डॉ रघुवंशी, परिषदेचे आयोजक प्राचार्य डॉ एस बी पाटील, सनव्यक डॉ जय बागुल व प्रा महेश गांगुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मध्यप्रदेश मधील खंडवा जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या पायथाशी असलेल्या एका खेड्यात अत्यन्त हालाखीच्या कुटुंबात जन्मलेले व लहानपणापासूनच काबाळकष्ट करून स्वयंप्रेरणेने समाजातील प्रथम विज्ञान शाखेत उच्चविद्याविभूषित झालेले प्रा डॉ प्रकाश लोहार यांनी चोपडा येथील प्रताप विद्या मंदिर व महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या दादासाहेब डॉ सुरेश जी.महाविद्यालय, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती, महाराष्ट्र् राज्य अभ्यासक्रम संशोधन व पाठयपुस्तक निर्मिती मंडळ, पुणे, श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे श्रीमती पार्वताबाई बाजीराव महाविद्यालय, दोंडाईचा तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठांत सन १९८८ पासून दर्जेदार शैक्षणिक व संशोधनाच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवीला व संस्थांच्या नावलौकिकात भर पाडली . एक शिक्षक म्हणून प्रा डॉ लोहार यांचे विद्यापीठातील अधिसभा व विद्यापरिषद सदस्य, अभ्यासमंडळ अध्यक्ष, प्राश्नीक मंडळ, संशोधन मंडळ या सारख्या वैधानिक समित्यामधील केलेले उल्लेखनीय कार्य; भारतातील ६८ विद्यापीठात विविध अभ्यासक्रमात समाविष्ट प्रा डॉ लोहार लिखित २२ संदर्भ व पाठयपुस्तके, कमीतकमी साधनव्यवस्थेचा वापर करून ३ एमफिल व १० पीएचडीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून यशस्वीपणे बजावलेली त्यांची भूमिका; जैवविविधता, औषधी वनस्पतींचा वापर व नुकतेच कर्करोगासंदर्भात प्रकाशित झालेलं त्यांचे पेटंट; इंटरनेटच्या माध्यमातून गुगल स्कॉलर, रिसर्च गेट व एडी सांयटिफिक इंडेक्स प्रकाशित करणाऱ्या जागतिक स्तरावरील सदोदित अद्ययावत होत असलेली प्रा डॉ लोहार यांच्या संशोधनाची माहिती व अनेक संशोधकांनी त्यांच्या कार्यात घेतलेली दखल; असंख्य गरीब व गरजु विद्यार्थ्यांना आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व नोकरी संदर्भात केलेली मदत; प्राचार्य डॉ लोहार यांच्या अशा आदर्श व प्रेरणादायी कार्याची दखल अक्कलकुवा महाविद्यालय व श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था, धुळे यांनी घेतली.
दिनांक २२ व २३ ऑक्टोबर दरम्यान धुळे येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कर्मवीर डॉ पी आर घोगरे विज्ञान महाविद्यालयाचा प्राणिशास्त्र विभाग व निसर्गवेध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय परिषदेत उदघाटन समारंभात संस्थेचे चेअरमन तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते प्राचार्य डॉ लोहार यांना त्यांची शिस्त, परिश्रम, गुणवत्तेचा ध्यास, सामाजिक बांधिलकी व प्रशासकीय कामातील कौशल्य या गुणांची दखल घेत जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी एसपीडिएम महाविद्यालय, शिरपूर येथील प्राचार्य तथा विद्यापीठातील विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ एस एस राजपूत, परिषदेचे आयोजक विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम व्ही पाटील, पक्षीतज्ञ अनिल महाजन, प्रा डॉ पी एम व्यवहारे, डॉ भागवत, प्राणिशास्त्र विभागातील प्राध्यापक मित्र व परिषदेत २०८ सहभागी प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ लोहार यांच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर झालेल्या सन्मानाने श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष डॉ संजय पाटील, कार्यलयीन अधीक्षक प्रमोद पाटील, कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मनोहर पाटील, दोंडाईचा महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख, सचिव अमित पाटील, सदस्य डॉ रवींद्र देशमुख, सौ जुई अमित पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातुन प्रा डॉ लोहार यांचे कौतुक होत आहे.