बॅनर्सबाजीने आयत्या बिळ्यावर नागोबा होऊ नका.. भुयारी गटारींसाठी कोट्यावधींचा निधी आणण्याचे श्रेय आमदारांचेच..! बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील यांची स्पष्टोक्ती
चोपडा दि.५(प्रतिनिधी)
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान(राज्यस्तर) अंतर्गत ९२.२८ कोटी व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ४१.९७ कोटी रुपयांची भुयारी गटार करणे कामांच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून मार्गी लावून दिले असून चोपडा शहराला एवढा मोठा निधी आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्याच पाठपुराव्यामुळे शक्य झाले आहे. चोपड्याच्या गत इतिहासात सत्ताधारी पक्षात लाल दिव्यांची गाडी मिळालेल्या महोदयांची खुर्ची झिजून गेली पण एव्हढा निधी कधी आणला नाही हे सत्य झाकले गेले नसल्यावरही आज मात्र त्यांचे समर्थकांनी आमदारांनी मिळवून आणलेले कामे आम्ही मिळवून आणल्याचा खोटा बनाव बॅनर्सद्वारे करणे याला काय म्हणावे? असा प्रश्न करीत हा केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा केविलवाणा प्रयत्न असून आमदारांच्या पाठपुराव्याचे प्रत्यक्ष कागदपत्रे व स्क्रीन शॉट चे डाक्युमेंट देऊन विरोधकांचा खोटा दावा बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी आयोजित पत्रपरिषदेत खोडून काढला आहे.
तालुक्यातील आदिवासी पाड्या वस्त्यांपासून गल्ली बोळात आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व विकास पुरुष माजी आमदार चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे यांच्या अथक परिश्रमाने झंझावाती विकास कामे सुरू असल्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकू लागली आहे.त्यामुळे आयत्या पीठावर रेघोट्या ओढण्याची नामी शक्कल लढवून शहरातील कामे आम्ही मंजूर करून आणण्याचा बॅनर्सबाजी करणे म्हणजे राजकारणाची पायरी खालविली असल्याचा टोला लगावत जनता काही दुधखुळी राहील नसून भूलथापांना बळी पडण्या इतपत अनाडी राहिली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले
चोपडा नगरपालिका हद्दीत सर्वत्र भुयारी गटारी व्हाव्यात हे शहरवासीयांचे स्वप्न आता पूर्णत्वाकडे असून यासाठी गेल्या वर्षभरापासून वेळोवेळी आमदार लताताई सोनवणे यांनीच मंत्रालयात पत्रव्यवहार करून जवळपास कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर घेतला आहे. परंतु याचे श्रेय नगरपालिकेतील काही माजी पदाधिकारी घेण्याचा प्रयत्न करीत असल्यास ते जनतेच्या नजरेतून उतरून नामुष्की ओढवून घेतील असा सल्ला देत आता शहरातील कामांचा धुमधडाका लवकरच शहरवासीयांना पाहावयास मिळेल अशी माहितीही नरेंद्र पाटील यांनी दिली .यावेळी संचालक रावसाहेब पाटील,अॅड.शिवराज पाटील, राजेंद्र पाटील,अशोक जाधव,कैलास बावीस्कर,संजीव शिरसाठ,प्रताप पाटील,मंगल इंगळे,दीपक चौधरी, कुणाल पाटील, गणेश पाटील आदी उपस्थित होते.