मुख्याध्यापक विलास पाटील यांच्या तर्फे सेवापूर्ती निमित्त तांदळवाडी हायस्कूलला १ दूरदर्शन संच भेट
चोपडा दि.१( प्रतिनिधी):शालेय पोषण आहारात देण्यात येणाऱ्या मुलांच्या खिचडीत शासकीय वाट्यासोबत स्वतःचा आर्थिक हिस्सा देऊन खिचडी अधिक चविष्ट बनवणारे, आपल्या कार्यकाळात कमीतकमी रजा घेणारे, प्रामाणिक व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंची मदत करणारे बहुआयामी निर्व्यसनी विनम्र व्यक्तिमत्व असणाऱ्या मुख्याध्यापक विलास पाटील यांची निष्कलंक प्रामाणिक सेवासमाप्ती झाल्याचे प्रतिपादन कवी अशोक नीलकंठ सोनवणे यांनी केले.
सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळाच्या तांदळवाडी येथील जय श्री दादाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक विलास पंढरीनाथ पाटील (खेडीभोकरीकर) यांच्या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. शहरातील माध्यमिक कन्या विद्यालयाच्या सभागृहात आयोजित सेवापूर्ती सोहळ्याच्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्या .विलास पाटील यांनी शिक्षक म्हणूनच्या आपल्या चांगल्या शैक्षणिक कर्तव्या सोबत सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातही सुंदर काम केलंय अश्या शब्दांत त्यांचा कार्यगौरव करीत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात .
याप्रसंगी संस्थापक माजी संचालक अँड.डी.पी पाटील, विद्यमान उपाध्यक्ष सतीश गोकूळ पाटील, सहसचिव अँड. हृषिकेश मच्छिंद्रनाथ पाटील, सर्वश्री संचालक ज्ञानेश्वर नारायण पाटील, डॉ . पवन डोंगर पाटील, राजाराम भावलाल पाटील, जितेंद्र रामलाल पाटील, गोविंद रमेश पाटील, पद्माकर जीवनलाल चौधरी, योगराज गोकूळ पाटील, तसेच अँड.यु.के. पाटील, मुख्या नरेंद्र भावे, प्रवीण पाटील, सुनील पाटील, मुख्या जोशी वडती उपस्थित होते.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास पाटील हे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेचे कार्याध्यक्ष असून ते रोटरी क्लब ऑफ चोपडाचे माजी अध्यक्ष तथा माय मराठी महाराष्ट्र संघ राज्यउपाध्यक्ष, सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
या वेळी मुख्या .विलास पाटील यांच्या सेवा कार्याचा गौरव करणारी शिक्षक मनोगते व्यक्त केली. तसेच मुख्याध्यापक विलास पाटील यांचा संस्थेच्या विविध विभागांतर्फे तसेच अनेकांनी व्यक्तिगत सत्कार केले. नुकतेच विलास पाटील यांच्या मोठ्या वहिनींचे अकस्मात निधन झालेलं असल्याने सेवापूर्तीचा मोठा कार्यक्रम व भोजन खर्च टाळत मुख्या . विलास पाटील यांनी विद्यार्थी हिताच्या भूमिकेतून तांदळवाडी हायस्कूलला ४३ इंची १अँड्रॉईड TV भेट दिला . याआधी गतवर्षी विलास पाटील यांनी संस्था मुख्य शाखा कन्या विद्यालयास सर्व वर्ग डिजीटल करणे कामी पुढाकार घेत स्वतः ४३ इंची २ अँड्रॉईड TV संच दिले होते . या सोहळ्याचे प्रास्ताविक डी .जे . पाटील यांनी तर सूत्रसंचालन ए. पी. पाटील यांनी व आभारप्रदर्शन मुख्याध्यापक पी. एस. पाटील यांनी केले.