विचखेडा,ता.चोपडा दि.३०मार्च( प्रतिनिधी चंद्रकांत पाटील) : तालुक्यातील धूपे खूर्द येथील भरत जीवन कोळी यांच्या राहत्या घराला भीषण आग लागल्याने घरांतील कापूस विक्रीतून मिळालेल्या दोन लाख पाच हजारांच्या रोकडसह घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने सर्वत्र हाहाकार उडाला . परिवार उघड्यावर आल्याने गांवभर सहानुभूतीची चर्चा सुरू असून कीर्तन सप्ताहाचाआजच समारोपानिमित्त महाप्रसाद भंडारा कार्यक्रमही होता अशा पावन दिवशी एका हभप भक्तांवर काळाने घाला घातल्या देवा पांडुरंगा तूं कुठे आहेस अशी केविलवाणी हाक भाविक भक्तांनी केली.
याबाबत प्राप्त माहिती अशी,धूपे खूर्द गांवी गेल्या सहा दिवसांपासून किर्तन सोहळा सुरू होता .आज शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन आटोपल्यानंतर महाप्रसाद भंडारा कार्यक्रम सुरू होता.त्याचवेळेस गावातील भरत जीवन कोळी यांचा संपूर्ण परिवार कार्यक्रम स्थळी गेलेला असतांनाच घरात अचानक आग लागल्याने गावकऱ्यांनी धाव घेतली मात्र आगीने रौद्ररूप धारण करून घरातील फ्रीजसह घरातील अन्नधान्यासह संसारोपयोगी वस्तू जळून भस्मसात झाल्या व कापुस विकून आलेले २लाख ५ हजार जळून बेचिराख झाल्याने संपूर्ण परिवाराच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.आग विझविण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून नियंत्रण मिळविले. तलाठी यांनी सदरील घराचा पंचनामा केला आहे. मात्र आग कशामुळे लागली याचे समजू शकले नाही.सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.सदरील शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट कोसळेल असल्याने मदतीसाठी अनेकांना पुढे येण्याची गरज असल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे.