चोपडा (प्रतिनिधी)* कोरोना काळातील लॉकडाऊनची संधी साधून रासायनिक खतांच्या कंपन्या व व्यापारी यांनी परस्पर खतांच्या भाववाढीचे नवीन दरपत्रक जाहीर करून एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच केलेली आहे. यामुळे जगाच्या पोशिंद्याला कोणीच वाली राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी या पत्रकान्वये दिलेली आहे.
वास्तविक पाहता केंद्र सरकार व कृषी विभाग यांनी जुन्या दरपत्रकाप्रमाणे खतांची विक्री करावी असे नमूद केलेले असताना रासायनिक खतांच्या कंपन्या व व्यापारी यांनी नवीन दरपत्रक आणलेच कसे? हा ही संशोधनाचा विषय आहे. याचा अर्थ या कंपन्यांवर तसेच व्यापाऱ्यांवर सरकारचा वचक नाही असेही म्हणता येईल. ही एक प्रकारे सर्वसामान्य शेतकऱ्यांची लूटच होत आहे, ही लूट थांबली पाहिजे. शेतकरी आपल्या भूमीशी, मातीशी इमान राखून राबराब राबतो स्वतः अर्धपोटी राहून जगाला पोटभर अन्न मिळेल यासाठी काबाडकष्ट करतो, रक्ताचे पाणी करून त्याच्या घामाला दाम मिळत नाही. म्हणून शेतकरी हा नावालाच जगाचा पोशिंदा राहिलेला आहे. ज्याप्रमाणे व्यापाऱ्यांनी मनमानी करून खतांच्या किंमती भरमसाठ वाढविल्यात त्याचप्रमाणे सर्वच मालाचे भाव का वाढविले नाहीत? असाही खडा सवाल श्री बाविस्कर यांनी उपस्थित केला आहे.
आधीच अस्मानी सुल्तानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा जीव वाचविणेसाठी वेळीच केंद्र व राज्य सरकारने याबाबत कृषी विभागाला कडक सुचना देऊन ज्या खतांच्या कंपन्या किंवा व्यापारी नवीन दराप्रमाणे खतांची विक्री करतील त्यांचा परवाना रद्द करण्याचा आदेश काढावा. यासाठी सर्वपक्षीय तसेच विविध,सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते,लोकप्रतिनिधी, शेतकरी यांनी याबाबत आवाज उठवावा, असेही आवाहन सामा. कार्यकर्ते जगन्नाथ टी बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी यावेळी केलेले आहे.