चौगाव किल्ल्यावरील प्रवेशद्वार ढासळण्याच्या अवस्थेत..पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

 चौगाव किल्ल्यावरील प्रवेशद्वार ढासळण्याच्या अवस्थेत..पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष 



 चौगाव,दि.२७ (प्रतिनिधी)उत्तर महाराष्ट्रातील अनेक किल्ले, गढ्या,बारव,पुरातन मंदिरे आणि इतर स्मारके हे अंतिम घटका मोजत आहेत.त्यातच चौगावचा किल्ला हा जळगाव जिल्ह्यातील एकमेव सुस्थितीत असणारा डोंगरी किल्ला.अनेक वर्षांपासून या किल्ल्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे.पण या किल्ल्याकडे पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केले आहे.जळगाव जिल्ह्यातील असे अनेक वारसे आहेत.पण यांच्याकडे लक्ष देण्यासाठी ना प्रशासन तयार आहे ना पुरातत्व विभाग. पुरातत्व विभाग हे अवशेष नष्ट होण्याची वाट पाहत आहेत की काय अशी शंका आता येऊ लागली आहे.

  स्थानिक आमदार यांनी काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी यांना चौगाव किल्ला राज्य संरक्षित स्मारक घोषित होणे बाबत पत्रव्यवहार केला होता.जिल्हाधिकारी महोदयांनी नाशिक विभागीय पुरातत्व अधिकारी यांना आदेशही दिले.पुरातत्व विभागाने सप्टेंबर महिन्यात वन विभाग, महसूल विभाग व भूमी अभिलेख विभागातून सर्व माहिती व नकाशे मागवले आणि संबंधित विभागांनी सर्व माहिती प्र पत्रात भरून पाठवली.परंतू आज पर्यंत पुरातत्व विभागाने ना चौगाव किल्ल्याचे संयुक्त सर्वेक्षण केले ना तारीख निश्चित केली.जिल्हाधिकारी साहेबांनी वन विभाग, महसूल विभाग व भूमी अभिलेख विभाग सोबत घेऊन चौगाव किल्ला संयुक्त सर्वेक्षणाची जबाबदारी अमळनेरचे प्रांताधिकारी मयुर भंगाळे यांच्याकडे सोपविण्यात आली.मयुर भंगाळे यांनी नाशिक विभागीय पुरातत्व अधिकारी यांना दोनदा पत्रव्यवहार केला पण त्यांना पुरातत्व विभागाने उत्तरही दिले नाही.पुरातत्व विभाग प्रांताधिकारी साहेबांना स्मरणपत्र पत्र पाठवून उत्तर देत नसेल तर ऐतिहासिक वारसा संवर्धन कसे करू शकतो.विशेष म्हणजे सात जानेवारी २०२६ रोजी झालेल्या ऐतिहासिक महावारसा समितीच्या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील असंरक्षित स्मारकांचा राज्य संरक्षित स्मारकात समावेश करावा असा विषय मंजूर करून तसे आदेशही जळगाव जिल्हाधिकारी यांच्या कडून पुरातत्व विभाग नाशिक यांना देण्यात आले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने