विद्यार्थी -पालक-शिक्षक संवादातून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग प्रशस्त! - प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे

 विद्यार्थी -पालक-शिक्षक संवादातून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग प्रशस्त! - प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे

चोपडा,दि.१७ (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि विद्यार्थी -पालक-शिक्षक यांच्यात समन्वय वाढविण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा येथील पदव्युत्तर व संशोधन भूगोलशास्त्र विभागातर्फे विद्यार्थी-पालक-शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसह त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावर भर देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे होत्या. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे, डॉ. ए. बी. सूर्यवंशी, महाविद्यालयाचे समन्वयक तथा भूगोलशास्त्र विभागप्रमुख डॉ. शैलेश वाघ,  तसेच भूगोल विभागातील सहकारी प्राध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. शैलेश वाघ यांनी विद्यार्थी-पालक-शिक्षक मेळाव्याची भूमिका आणि महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महाविद्यालय, शिक्षक आणि पालक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद व समन्वय असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी समजून घेऊन त्यांच्यात अभ्यासाची आवड, आत्मविश्वास, मूल्यशिक्षण आणि शिस्त निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रा. डॉ. संध्या सोनवणे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शिक्षकांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि शैक्षणिक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग यांना प्राधान्य द्यावे. तसेच पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन द्यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मेळाव्यात पालक प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षकांकडून मिळणारे मार्गदर्शन आणि विद्यार्थी-पालक-शिक्षक यांच्यातील संवादाचे महत्त्व याविषयी आपली मते मांडली. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाविद्यालयाने राबविलेल्या अशा उपक्रमांचे त्यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी पालक आणि शिक्षक यांनी परस्पर सहकार्याने प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

तसेच पालक म्हणून उपस्थित असलेल्या आदिवासी मुलींचे वसतिगृहाच्या  गृहपाल  पुष्पा तेलंग यांनी मेळाव्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, नियमित उपस्थिती, अभ्यासातील अडचणी, शैक्षणिक शिस्त आणि भविष्यातील करिअरच्या संधी याविषयी महाविद्यालय व भूगोल विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. सदर  मेळाव्यात भूगोल विषयातील उच्च शिक्षण, संशोधन, स्पर्धा परीक्षा आणि रोजगाराच्या विविध संधींची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या महत्त्वावरही भर देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या समजून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी परस्पर संवाद कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुकेश पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. संगीता भोसले यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी डॉ. मोतीराम पावरा, मयुरी पाटील, रुपेश पाटील, दामिनी पाटील, परिचर रविंद्र पाटील यांनी सहकार्य केले. मेळाव्यात विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने