कौशल्यविकास, आत्मविश्वास आणि नियोजनातून करिअरला नवी दिशा द्या”: प्रा. डॉ. एस. ए. वाघ

 कौशल्यविकास, आत्मविश्वास आणि नियोजनातून करिअरला नवी दिशा द्या”: प्रा. डॉ. एस. ए. वाघ

     

चोपडा,दि.१७(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील  मानसशास्त्र विभाग आणि सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत 'करिअर काउन्सलिंग मार्गदर्शन कार्यशाळेचे' आयोजन दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी महाविद्यालयात उत्साहात करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे लाभले होते. तर व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. डॉ. एस. ए. वाघ, मानसशास्त्र विभाग प्रमुख तथा 'मानसमित्र केंद्र' समन्वयक डॉ. आर. आर. पाटील आणि डॉ. एस. एन. पाटील हे प्रमुख  व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षांना जल अर्पण करून करण्यात झाली. करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. अरविंद पाटील यांनी केले. त्यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनाची आवश्यकता, योग्य करिअर निवडीचे महत्त्व आणि भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक संधींची माहिती करून देण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमता व कौशल्यांची ओळख करून देऊन त्यांच्या करिअरविषयक वाटचालीला योग्य दिशा देणे हा या कार्यशाळेचा प्रमुख हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले.   

 कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. डॉ. एस. ए. वाघ यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना करिअर निवडीविषयी नवी दृष्टी आणि सकारात्मक दिशा दिली. विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक करिअरच्या पर्यायांपुरते मर्यादित न राहता बदलत्या काळातील विविध शैक्षणिक, व्यावसायिक आणि रोजगाराच्या संधींचा शोध घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. स्वतःच्या क्षमता, आवड, अभिरुची आणि कौशल्ये ओळखून वास्तववादी ध्येय निश्चित करणे, योग्य नियोजन करणे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या माध्यमातून ध्येय साध्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयक जागरूकता वाढण्यास, भविष्याबाबतचे संभ्रम दूर करण्यास आणि आत्मविश्वासाने करिअरची दिशा निवडण्यास प्रेरणा मिळाली. योग्य करिअर निवड ही केवळ रोजगार मिळविण्यापुरती मर्यादित नसून व्यक्तिमत्त्व विकास, स्वावलंबन आणि जीवनातील समाधान यांच्याशीही संबंधित असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कार्यशाळेच्या अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांनी सांगितले की, "आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून योग्य करिअर मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळते."

सदर कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी डॉ. एम. बी. पाटील, डॉ. मोतीराम पावरा, श्री. संदीप पाटील, श्री. रुपेश पाटील आणि श्री. चेतन बाविस्कर यांनी विशेष परिश्रम घेतले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसशास्त्र विभागाची विद्यार्थिनी प्रगती चव्हाण हिने अत्यंत प्रभावीपणे केले, तर उपस्थितांचे आभारप्रदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने