चोपडा महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधी व सुरक्षात्मक उपायांवर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न ♦️तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे- उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील

 चोपडा महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधी व सुरक्षात्मक उपायांवर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

♦️तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे- उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील

चोपडा,दि.११(प्रतिनिधी) : महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात विद्यार्थी व तरुणांमध्ये जनजागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने ' अंमली पदार्थ विरोधी व सुरक्षात्मक उपाय' या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना चोपडा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी, "तरुणांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहून स्वतःच्या आरोग्याची व भवितव्याची काळजी घ्यावी आणि समाजात जबाबदार नागरिक या नात्याने महिला सुरक्षा, रस्ते वाहतूक नियम, सायबर सुरक्षा, अंमली पदार्थ याबाबत दक्षता बाळगायला हवी." असे आवाहन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या एम.सोनवणे या उपस्थित होत्या.

याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून चोपडा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, तसेच चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पवन देसले, पोलिस उपनिरीक्षक युवराज वाळुंज, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. के. एन. सोनवणे, प्रा. डॉ.ए. बी. सूर्यवंशी आणि समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ आदि मान्यवर उपस्थित होते.

     कार्यशाळेदरम्यान उपस्थितांना अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच दैनिक जीवनात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सायबर, रस्ते वाहतूक, महिला सुरक्षा अशा विविध सुरक्षा विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आणि अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, महिलांचे संरक्षण, कायदेशीर हक्क व मदतवाहिन्यांची माहिती,  डिजिटल युगात ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियाचा गैरवापर आणि सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

     याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या एम. सोनवणे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना 'विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून आपले आयुष्य जपावे . महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे यातूनच जीवन सुखकर होईल', असा मोलाचा सल्ला दिला.

      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन समन्वयक डॉ. शैलेश वाघ यांनी केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी हर्षल पाटील, डॉ . एम.एल.भुसारे, डॉ.आर. आर. पाटील, एस. जी. पाटील, कल्पेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यशाळेस महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक बंधू भगिनी तसेच महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने