पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.. सात दिवसीय योग शिबिरास प्रारंभ

 पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.. सात दिवसीय योग शिबिरास प्रारंभ

चोपडा,दि.२१(प्रतिनिधी) : पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चोपडा यांच्या प्रांगणात *बारावा आंतरराष्ट्रीय योग दिवस* उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने दि. 21 जून ते 27 जून 2026 या कालावधीत *सात दिवसीय योग शिबिराचे आयोजन* करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास पंचायत समिती चोपडा गटशिक्षणाधिकारी मा. अजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली आणि योगासन प्रात्यक्षिक द्वारे करून सक्रिय सहभाग घेतला. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना योगाचे आधुनिक जीवनातील महत्त्व विशद केले. आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये योग हा शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक संतुलन राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच योगाची सवय अंगीकारल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमास प्रामुख्याने सौ. हेमलताताई बोरोले यांची उपस्थिती होती. तसेच विद्यालयातील सर्व विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी विद्यालयाच्या योगशिक्षिका सौ. गायत्री शिंदे यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, त्रिकोणासन, शवासन, वज्रासन यांसह अनेक योगप्रकारांचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच अनुलोम-विलोम, कपालभाती, भ्रामरी यांसारख्या प्राणायाम प्रकारांची माहिती देऊन त्यांचे आरोग्यदायी फायदे स्पष्ट केले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहते, मन प्रसन्न राहते, एकाग्रता वाढते आणि तणाव कमी होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षक, प्राध्यापक व  कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली योगासनांचा सरावही केला.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले आणि विद्यमान अध्यक्ष  पंकज बोरोले यांच्या आरोग्यविषयक सकारात्मक दृष्टिकोनाचा विशेष उल्लेख करण्यात आला. संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी ते नेहमीच आग्रही असतात. संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेमध्ये वेळोवेळी योग शिबिरे, आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिरे आणि विविध तंदुरुस्तीविषयक उपक्रम राबविले जातात. निरोगी कर्मचारी आणि निरोगी विद्यार्थी हेच संस्थेच्या प्रगतीचे खरे आधारस्तंभ आहेत, या विचारातून संस्थेमध्ये आरोग्य संवर्धनाची संस्कृती रुजविण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सुरू झालेल्या या सात दिवसीय योग शिबिरामध्ये विविध योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन ई. चे आयोजन 28 जून 2026 पर्यंत सकाळी 5:30 वाजता करण्यात आले असून विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांना निरोगी व संतुलित जीवनशैलीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

योग दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमामुळे विद्यालय परिसरात आरोग्य, सकारात्मकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने