एक लाख सीडबॉलद्वारे हरित क्रांती; नूतन विद्यालयाचा पर्यावरण संवर्धनासाठी अनोखा उपक्रम

 एक लाख सीडबॉलद्वारे हरित क्रांती; नूतन विद्यालयाचा पर्यावरण संवर्धनासाठी अनोखा उपक्रम

दोंडाईचा दि.२८(प्रतिनिधी): पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने शिंदखेडा तालुक्यातील धमाणे येथील नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने एक लाख सीडबॉल तयार करून विविध डोंगराळ भाग, मोकळ्या जागा आणि वनक्षेत्रात टाकण्याचा अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविला. संकल्पना संस्थेचे अध्यक्ष आर. डी. पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात उपाध्यक्ष उगम पाटील, संचालिका सुनिता पाटील, निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेम कुमार अहिरे, राज्याध्यक्ष डी आर पाटील, राज्य महासचिव संतोष पाटील, जिल्हाध्यक्ष डी बी पाटील, मुख्याध्यापक व्ही. जी. पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 देशी वृक्षांच्या बियाण्यांपासून सीडबॉल निर्मिती

या उपक्रमांतर्गत कडुलिंब, शिवण, शिसम, बाभूळ, बकाम, चिंच, काशीद, सिताफळ, रामफळ, करंज आदी देशी वृक्षांच्या बियाण्यांपासून एक लाख सीडबॉल तयार करण्यात आले. त्यानंतर हे सीडबॉल डोंगराळ भाग, मोकळ्या जागा तसेच वनक्षेत्रात विखुरण्यात आले. या माध्यमातून भविष्यात मोठ्या प्रमाणात वृक्षसंवर्धन होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे.

 आर. डी. पाटील यांच्या संकल्पनेतून साकारला उपक्रम 

पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज ओळखून आर. डी. पाटील यांनी ही अभिनव संकल्पना मांडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, वृक्षसंवर्धनाची सामाजिक जबाबदारीही अधिक दृढ झाली आहे.

 *विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक विचारांची जडणघडण.* 

सीडबॉल निर्मितीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना वृक्षलागवडीचे महत्त्व अनुभवातून समजले. या उपक्रमामुळे त्यांच्यामध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धनाची भावना आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक बळकट झाली.

नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा हा हरित उपक्रम परिसरातील इतर शैक्षणिक संस्थांसाठी प्रेरणादायी ठरत असून, पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक सहभागाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. भविष्यात या सीडबॉलमधून उगवणारी झाडे परिसराचे हरित वैभव वाढविण्यास मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने