आरोग्य योग अँड नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूट (AYNI) तर्फेआंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
नाशिक दि.२८(प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नाशिक येथील सतपूर मंडळात आरोग्य योग अँड नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूट (AYNI) तर्फे योग कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन सतपूर मंडळाचे अध्यक्ष श्री. गौरव बोडके यांनी केले होते.
कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्या सौ. रश्मीताई हिरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून देत आरोग्य योग अँड नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूटच्या नाशिक समन्वयक सौ. जयश्री भामरे, योग शिक्षिका सौ. प्रिया जोशी व सौ. नेत्रा गज्जर यांनी घेतलेल्या योग सत्रांचे विशेष कौतुक केले.
यावेळी AYNI संस्थेमार्फत सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योग व नैसर्गिक आरोग्यविषयक अभ्यासक्रमांची माहितीही रश्मीताई हिरे यांनी उपस्थितांना दिली. तसेच संस्थेतर्फे स्मृतिचिन्हांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सौ. जयश्री भामरे यांनी AYNI चे संस्थापक सदस्य डॉ. विजय कुकरेजा यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या रश्मीताई हिरे व श्री. गौरव बोडके यांचे आभार मानले. या कार्यक्रमास योगप्रेमी साधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
