चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करा : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश


चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करा : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा दि.२०(प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील दिनांक 1 जानेवारी, 2011 पर्यंत अस्तित्वात असलेल्या निवासी अतिक्रमणांचे नियमितीकरण करण्याबाबत उपविभागीय अधिकारी अमळनेर, श्री मयुर भंगाळे  यांच्या अध्यक्षतेखाली  आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात व चोपडा नगरपरिषद मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्यासह नगरपरिषद अधिकारी उपस्थित होते. 

या बैठकीत चोपडा शहरातील विविध भागांमधील शासकीय जमिनी, त्यावरील निवासी अतिक्रमणांची स्थिती व आरक्षणे तसेच शासन निर्णयानुसार पात्रतेच्या अटी याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.  पात्र लाभार्थ्यांना नियमितीकरण प्रक्रियेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही गतिमान करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. 

नागरिकांमध्ये योजनेबाबत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी शहरातील विविध प्रमुख ठिकाणी माहितीपर बॅनर लावणे तसेच घंटागाडी व इतर प्रसार माध्यमांद्वारे प्रचार करण्याची सूचना करण्यात आली.  संबंधित नागरिकांना अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी तात्काळ अर्ज वितरण सुरू करण्याबाबत सूचना करण्यात आली. तसेच नागरिकांना आवश्यक मार्गदर्शनासाठी तात्काळ स्वतंत्र मदत कक्ष (Help Desk) सुरू करण्याबाबत  आदेशित केल्यानुसार उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांच्या उपस्थितीत 'अतिक्रमण नियमानुकूल मदत कक्ष' कार्यान्वित करण्यात आला. मदत कक्षामार्फत नागरिकांना अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रांची माहिती, पात्रतेच्या अटी तसेच प्रक्रियेबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. 

यावेळी काही नागरिक अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे याबाबत चौकशी करिता आले असता उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांच्या हस्ते त्यांना अर्ज वितरीत करण्यात  येऊन सदर अर्ज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचे सूचित  करण्यात आले. 

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमितीकरणासाठी पात्र ठरणाऱ्या नागरिकांनी  शासन निर्णयाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज सादर करावेत, अर्ज सादर करतांना येणाऱ्या अडचणी निराकरण करणेकामी मदत कक्षाची मदत घ्यावी असे आवाहन  उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांच्याकडून करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने