जळगाव जिल्ह्यातील टोकरे कोळी जमातीला पडताळणी समितीकडून भयंकर त्रास..पुणे आयुक्तांनी लक्ष घालण्याची आदीवासी टोकरे कोळी परिषदेचे मदन शिरसाटे यांची मागणी
चोपडा दि.१०(प्रतिनिधी) : धुळे अनुसूचित जात प्रमाणपत्र पडताळणी तपासणी समितीकडून जळगाव जिल्ह्यातील टोकरे कोळी जमातीचे जात वैधता अर्ज जमातीच्या नोंदी अभावी स्विकारीत नाहीत हा अन्याय त्वरित थांबवावा व आदिवासी बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी आयुक्त,महा. राज्य, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्याकडे आदिवासी टोकरे कोळी समाज परिषदेचे कार्यकर्ते मदन शिरसाटे यांनी केली आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले की, तुमच्याकडील समित्यांमधील अधिकारी नियम, कायदे यांचे पालन न करता आदिवासींची अडवणूक करून ख-या आदिवासींना घटनादत्त अधिकारापासून लांब ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे षडयंत्र करून त्रास देत आहेत.तसेच सदरील जमाती लोकांना वैधतेच्या नादी लागू नका असा चुकीचा संदेश समित्यांमधील अधिकारी पूर्वग्रह दूषित दोषभावनेने आदिवासींना देत असून मानसिक, शारीरीक, आर्थिक त्रास कसा देता येईल याचा प्रयत्न करीत आहेत.तरी आपण त्वरित लक्ष घालून त्यावर उपयोजना करावी अन्यथा जनतेचा संयम सुटून अघटीत घटना घटण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी आपण लक्ष घालून आदिवासी जनतेला न्याय द्यावा अशी विनंती एका पत्रकान्वये सरचिटणीस मदन शिरसाटे यांनी केली आहे.
