अथक प्रयत्नाने यश मिळवणे सोपे मात्र यश टिकवणे आणि पचविणे फारच कठीण : माधुरीताई मयूर
♦️पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्त श्री प्रशांत बडगुजर यांचा भव्य सत्कार
चोपडादि.२४(प्रतिनिधी) एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराचे माजी विद्यार्थी व नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक PSI परीक्षेत उज्वल यशाचे मानकरी ठरलेले श्री प्रशांत बडगुजर यांचा संस्था व शाळेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर यांनी सामान्य परिस्थितीतून असामान्य यश मिळवणे व या धावत्या जगात तेच यश टिकविणे तसेच कायमस्वरूपी पचविणे अत्यंत कठीण आहे. त्यासाठी निवडलेला सत्याचा व नैतिकतेचा मार्ग जरी खडतर असला तरी सदैव परिस्थितीची जाण व जबाबदारीचे भान आपण आदर्श म्हणून समोर ठेवले पाहिजे. आज नैतिकता शून्य असलेली अनेक माणसं आपण पावलो-पावली अनुभवतो. समाजसेवेचे व्रत म्हणून आपण सेवा स्वीकारतो मात्र कालांतराने तीच सेवा फक्त चैनीची व उपभोगाची वस्तू म्हणून जोपासतो. यासाठी समाजातील काही आदर्श जी आपली सेवा प्राणपणाने करतात यांना चीर स्मरणात ठेवावे तरच आपल्या कुटुंब, समाज, व गुरुजनांच्या नावलौकिकात भर पडते. अशी माफक अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
श्री प्रशांत बडगुजर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,माणसाचे भवितव्य हे काळावर ठरत असते. संशोधन क्षेत्रात स्वतःचे करिअर घडवण्याची इच्छा असताना मनात समाजसेवेचे बीज पेरले गेले व आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून उच्च अधिकारी पदापर्यंत पोहोचण्याचा मानस बांधित इथपर्यंत पोहोचलो. अजून स्पर्धा संपलेली नाही, जिद्दीने पुढे जाण्याची इच्छा आहे, मात्र पाठीवर आपणा सर्वांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा असाव्यात अशी मौलिक भावना त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथ काका अग्रवाल, संस्थेचे चेअरमन श्री राजाभाई मयूर, संचालक चंद्रहासभाई गुजराथी, सर्व संचालक, संस्था समन्वयक श्री गोविंदभाई गुजराथी,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पी. एस. गुजराथी, उपमुख्याध्यापिका श्रीमती माधुरी पाटील , उपप्राचार्य श्री जे एस शेलार, पर्यवेक्षक श्री ए एन भट, श्री एस व्ही करमरकर, श्री पी ए नागपुरे सर्व शिक्षक बंधू भगिनी,लेखनिक- कर्मचारी बंधू सर्वांनी मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा दिल्यात.या सत्कार प्रसंगी श्री प्रशांत बडगुजर त्यांचे आदर्श आई -वडील , श्री गोकुळ बडगुजर, विवेकानंद प्रिंटिंग ऑफसेट चे संचालक श्री रविंद्र बडगुजर यांची उपस्थिती होती.
