चोपडा नगरपरिषदेत पर्यावरणपूरक पाककला स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षीस वितरण तर सफाई कर्मचारी महिलांना साडी वाटप
🔲 महिलांनी कौशल्याचे प्रदर्शन करीत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्याचे नगराध्यक्षा सौ.नम्रता पाटील यांचे आवाहन
चोपडा,दि.१९(प्रतिनिधी) नगर परिषदेचा पर्यावरणपूरक पाककला स्पर्धेतील विजेत्या महिलांना नगराध्यक्षा नम्रता पाटील व मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या शुभहस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र व ट्रॉफी प्रदान प्रमाण पत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले असून सफाई कर्मचारी महिलांना साडी वाटप करून सन्मान करण्यात आला आहे.
माझी वसुंधरा अभियान 6.0 व स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत अन्नपूर्णा महोत्सव व पर्यावरणपूरक पाककला स्पर्धा पार पडलेली होती या स्पर्धेत एकूण 65 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धकांनी सादर केलेल्या पदार्थांची चव तसेच पर्यावरणपूरक सजावट हे प्रेक्षकांचे प्रमुख आकर्षण ठरले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना काल 18/02/2026 रोजी नगरपरिषदेच्या छ. शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील व मुख्याधिकारी श्री. रामनिवास झंवर यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्या महिलांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व ट्रॉफी प्रदान करण्यात आली, तर उर्वरित पाच महिलांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली .यात प्रमिला छगन बडगुजर, रंजना विजय चौधरी, रुपाली पवन पाटील, किरण आनंदा चौधरी, अनिता संतोष पारधी, सुनैना झंवर, कविता पाटील, वर्षाराणी गायकवाड, वर्षा सोनवणे, हर्षदा धनगर व सपना लाड यांना बक्षीस प्रदान करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील यांनी स्पर्धकांच्या मेहनतीचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे महिलांना अधिक प्रोत्साहन मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तर मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी महिलांनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करावे व स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करावे, असे आवाहन केले.यावेळी महिला सफाई कर्मचाऱ्यांना सन्मान म्हणून साडी वाटप करण्यात आले. महिला कर्मचाऱ्यांनी नगरपरिषदेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमासाठी स्वच्छता निरीक्षक श्रीमती दिपाली साळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले, तर कर निरीक्षक श्री. संदीप गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम प्रसंगी उपमुख्याधिकारी श्री. संजय मिसर, स्वच्छता निरीक्षक वसंत राठोड, स्वच्छता निरीक्षक जयेश भोंगे, विद्युत अभियंता प्रमोद पाटील, शहर समन्वयक श्री. स्वप्निल धनगर आदी उपस्थित होते.
