कै. लक्ष्मणराव पांडुरंग पाटील व कै. पितांबर दाजभाऊ यांच्या स्मृतीदिना निमित्त आज हातेड खुर्द येथे कीर्तन सोहळा व मोफत नेत्रशस्त्रक्रिया शिबिर
हातेड,ता.चोपडा दि.१७(प्रतिनिधी) : तालुक्यातील हातेड खुर्द येथे कै. आप्पासो. लक्ष्मणराव पांडुरंग पाटील व कै. पितांबर दाजभाऊ यांच्या स्मृतीनिमित्त बुधवार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने रात्री ८ वाजता भव्य कीर्तन सोहळा होणार असून सकाळी मोफत मोतीबिंदू व नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन सोहळ्यास पंढरपूर क्षेत्राचे मठाधिपती ह.भ.प. गोविंद महाराज चौधरी (वरसाडेकर) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांच्या रसाळ कीर्तनातून भक्ती, संस्कार व समाजप्रबोधनाचा संदेश दिला जाणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. याच दिवशी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत श्री विठ्ठल रुख्माई मंदिराच्या प्रांगणात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच डोळ्यांच्या दुर्धर आजारांवरील शस्त्रक्रिया तपासणी शिबिर होणार आहे. ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाऊंडेशन (पाळधी), संकल्प सेवा फाऊंडेशन (धनवाडी) व आर. झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांनी आधार कार्ड व रेशन कार्ड झेरॉक्स प्रतीसोबत आणाव्यात. रक्त पातळ करणाऱ्या किंवा मधुमेहाच्या गोळ्या सुरू असल्यास संबंधित औषधे व डॉक्टरांची फाईल सोबत ठेवावी. तपासणीसाठी उपाशीपोटी यावे. ऑपरेशनसाठी निवड झालेल्या रुग्णांसाठी पनवेल येथे जाण्याची मोफत व्यवस्था तसेच रुग्णालयात जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे परिसरातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री नरेंद्र पितांबर बाविस्कर , श्री धर्मराज लक्ष्मणराव बाविस्कर, श्री नरेंद्र पितांबर बाविस्कर श्री अभय भिकनराव बाविस्कर यांनी केले आहे
