विटनेर जि.प. शाळेचा सांस्कृतिक सोहळा उत्साहात
चोपडा (प्रतिनिधी): तालुक्यातील विटनेर जिल्हा परिषद शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. तालुक्यातील ‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात प्रथम क्रमांक पटकावलेल्या या शाळेने जिल्ह्यातही अव्वल यावे, अशी अपेक्षा व्यक्त करत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी शाळेच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, “अधिकारी म्हणून सर्वच शाळा मला प्रिय आहेत; मात्र जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा माझी माय आहेत, तर इतर माध्यमांच्या शाळा माझ्या मावश्या आहेत.” मराठी माध्यमातून दहावीपर्यंत शिक्षण घेतल्याचा उल्लेख करत त्यांनी पालकांना संदेश दिला की, “पालकांना इंग्रजी भाषेचे ज्ञान असेल तरच मुलांना इंग्रजी माध्यमात प्रवेश द्यावा; अन्यथा मातृभाषेत भक्कम पाया घालणे महत्त्वाचे आहे.”
शाळेसाठी आधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध करून दिल्याची घोषणा करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक, ग्रामस्थ व पालकांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. “ज्या गावाने शाळेकडे लक्ष दिले, त्या गावाची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. मुले पालक व शिक्षकांचे अनुकरण करतात, त्यामुळे दोघांची जबाबदारी अधिक वाढते,” असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, त्यांनी प्रेक्षकांमध्ये बसून संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश एकनाथ पाटील होते. मुख्याध्यापक हेमंत भामरे यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. घोडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख प्रमोद बाविस्कर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ चे सिनेट सदस्य श्री अमोल सोनवणे,ग्रामसेवक रविंद्र महाजन, चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नंदकिशोर पाटील, मंडळ अधिकारी रविंद्र पाटील, सरपंच कविता मंगल पाटील, माजी सरपंच कविता दिलीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य अरुणा कोळी, निलेश कोळी, देविदास रायसिंग तसेच शाळेचा माजी विद्यार्थी संघ मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाची सुरुवात गावातील ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेली छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाटिका आणि “शाळा मराठी आमची” या सादरीकरणाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. गावातील आदर्श शेतकरी व आदर्श उद्योजकांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक विकास पाटील व मनिषा पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रवीण पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर हेमंत पाटील यांनी आभार मानले.
विटनेर येथील जिल्हा परिषद शाळेचा हा सांस्कृतिक सोहळा गावाच्या शैक्षणिक जाणीवा अधिक दृढ करणारा ठरला असून, जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवण्याच्या दिशेने शाळेची वाटचाल सुरू असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
