*नूतन मराठा महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी सुरू असलेल्या स्वयंसिद्धा कार्यशाळेचा समारोप*
जळगाव दि.२४( प्रतिनिधी)नूतन मराठा महाविद्यालय आणि कबचौ उमवी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीचे औचित्य साधून विद्यार्थ्यीनींसाठी सुरू असलेल्या स्वयंसिद्धा कार्यशाळेचा यशस्वी समारोप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा राजेंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तर विद्यार्थी विकास अधिकारी तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एन जे पाटील, युवती सभेच्या समन्वयिका डॉ माधुरी पाटील, मार्शल आर्ट ऑफ इंडिया च्या सदस्या तथा समाजसेविका डॉ मणी मुथा आणि स्वयंसिद्धा प्रशिक्षक राजेंद्र जंगले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
कार्यशाळेतून मिळालेल्या सुवर्णसंधीतून विकृतींचा सामना करुन जग जिंकायला शिकविणाऱ्या या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यीनींना मिळालेला आत्मविश्वास आणि त्यातून निघालेलं फलित याचा परिचय महाविद्यालयाच्या युवती सभेच्या समन्वयिका डॉ माधुरी पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात करुन दिला.गेल्या आठवड्याभरात प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यीनींनी संकटकालीन परिस्थितीवर मात कशी करायची या संदर्भात वेगवेगळ्या कराटे स्टेप च्या माध्यमातून प्रात्यक्षिक करून दाखविले, काही मुलींनी आपले अनुभव निडरपणे कथन केले एकंदरीत स्वयंसिद्धा प्रशिक्षक... यांच्या मार्गदर्शनाचे दर्शन मुलींमधील वाढलेल्या कमालीच्या आत्मविश्वासातून दिसून आले
स्वयंसिद्धा प्रशिक्षक राजेंद्र जंगले यांनी आपले अनुभव सांगताना या प्रशिक्षणात मी प्रशिक्षक घडविण्याचा प्रयत्न केला आहे येथून बाहेर पडलेल्या पन्नास मुली पुढे जाऊन पन्नास हजार मुलींना शिकवतील, प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलींचं सक्षमीकरण करण्याची संधी मिळाली हीच माझी खरी कमाई आहे असेही त्यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित डॉ मणी मुथा यांनी स्वरक्षणार्थ मार्शल आर्ट चे महत्व आणि मार्शल आर्ट चे प्रशिक्षण घेतांना होणाऱ्या किरकोळ दुखापतीतून कसे सावरता येते याचे काही उदाहरणे दिली. कुणी जर वेणी पकडली तर स्वतःची सुटका कशी करून घ्यायची अशा अनेक बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा राजेंद्र देशमुख यांनी विद्यार्थीनींशी संवाद साधताना भारतीय महिलेच्या गौरवार्थ "फुल नही चिंगारी हू, मै भारत की नारी हू " या घोषवाक्याचा उल्लेख केला. प्रशिक्षण घेऊन तुमचा आत्मविश्वास वाढला असून आता परत शिक्षणाकडे वळा आणि महाविद्यालयाला नियमित हजेरी लावा असे सांगून त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगताला विराम दिला.
सुत्रसंचलन प्राप्ती पवार आणि अश्विनी थोरात या विद्यार्थ्यांनींनी केले तर आभारप्रदर्शन प्रा जागृती आळेकर यांनी केले.या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक आणि बहूसंख्य विद्यार्थीनींसह विद्यार्थी देखील उपस्थित होते