हातेडला ३ तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या व रोकड चोरी.. बंद घराचे कुलूप तोडून साधला डाव
चोपडा,दि.२४ (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील हातेड खुर्द येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोन्याच्या बांगड्या आणि रोख रक्कम असा एकूण ३४ हजार रुपयांचा ऐवजावर डल्ला मारत हात साफ केल्याची घटना घडली .या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हातेड खुर्द (ता. चोपडा) येथील रहिवासी गोकुळ सतीलाल बाविस्कर (वय ६२, व्यवसाय शेती) यांचे घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी डाव साधला.
चोरट्यांनी फिर्यादीच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील पत्र्याचे बंद कपाट काहीतरी लोखंडी वस्तूच्या साह्याने उचकटून त्यातील ठेवलेले पत्नीचे दागिने व रोकड लंपास केली. यात जुन्या काळात बनवलेल्या ३ तोळ्यांच्या सोन्याच्या जुन्या वापरत्या बांगड्या आणि ५०० रुपये दराच्या ४० नोटा असलेली २० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३४ हजार रुपयांचा ऐवज पोबारा केला आहे.
