चोपडा नगरपरिषदेकडून घनकचरा व्यवस्थापन कामकाजाबाबत वस्तुस्थिती स्पष्ट


 चोपडा नगरपरिषदेकडून घनकचरा व्यवस्थापन कामकाजाबाबत वस्तुस्थिती स्पष्ट

चोपडा ,दि.२८(प्रतिनिधी) नगरपरिषदेमार्फत शहरातील घनकचरा व्यवस्थापन, दैनंदिन कचरा संकलन, गटार सफाई व कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम नियमितपणे करण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या कामकाजाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने नगरपरिषद प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.

चोपडा नगरपरिषदेच्या रामपुरा येथील गट नं. ४०६ मधील घनकचरा प्रकल्पाचे कामकाज मक्तेदारामार्फत करण्यात येत आहे. सदर मक्तेदारास कंपोस्ट खत प्रकल्प चालविण्याबाबत कार्यादेश देण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रकल्पात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर विंड्रो कंपोस्टिंग पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते, तर सुक्या कचऱ्याचे एमआरएफ (MRF) युनिटद्वारे दुय्यम वर्गीकरण (Secondary Segregation) करण्यात येते. त्यामुळे सद्यस्थितीत प्रकल्पात प्राप्त होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया व वर्गीकरणाचे कामकाज केले जात आहे. तथापि, प्रकल्प परिसरात दिसून येणारे मोठ्या प्रमाणातील कचऱ्याचे जुने ढिगारे हे मागील सात ते आठ वर्षांपासून साचलेले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संबंधित मक्तेदारास कार्यादेश देऊन केवळ चार महिने झाल्याच्या पार्श्वभूमीवर सदर जुने ढिगारे हे सध्याच्या कामकाजातील निष्काळजीपणामुळे निर्माण झाल्याचा आरोप वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

रामपुरा येथील घनकचरा प्रकल्प परिसरात दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी जुन्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना आग लागली होती. सदर परिसरात जुना साठवलेला कचरा, आरडीएफ (RDF) व गटारीतील गाळमिश्रित कचरा आढळून आला आहे. जुन्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये जैविक पदार्थांचे विघटन, अंतर्गत उष्णता निर्माण होणे तसेच मिथेनसारख्या ज्वलनशील वायूंची निर्मिती यांमुळे आग लागण्याची शक्यता असते. यापूर्वीदेखील अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. 

सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागामार्फत तातडीने कार्यवाही करण्यात आली. तसेच नगरपरिषदेच्या स्वच्छता विभाग व विद्युत विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या तत्पर कार्यवाहीमुळे संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यास मदत झाली. सदर घटनेबाबत प्रशासनाने कोणतीही माहिती लपविलेली नसून, उपलब्ध वस्तुस्थितीच्या आधारे आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

प्रकल्प परिसरात गटारीतील गाळ व मिश्र कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात ढिगारे आढळून आल्याने त्यांची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत  मुख्याधिकारी यांनी संबंधित मक्तेदारास आवश्यक निर्देश दिले आहेत. तसेच खत प्रकल्पावरील कचऱ्याचे वजन करण्यासाठी असलेला वे-ब्रिज बंद अवस्थेत असल्याबाबतचा अहवाल यापूर्वीच संबंधित बांधकाम विभागास सादर करण्यात आलेला आहे.

चोपडा शहरातील घनकचरा व्यवस्थापनांतर्गत द्वारस्तरीय कचरा संकलनाचे काम नियमितपणे करण्यात येते. शहरातील १५ प्रभागांसाठी मक्तेदारामार्फत १६ घंटागाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, नागरिकांच्या घरांमधून दैनंदिन कचरा संकलित केला जातो. व्यापारी प्रतिष्ठानांमधून दिवसातून दोन वेळा कचरा संकलित करण्याची व्यवस्था आहे. तसेच चिकन वेस्ट व फिश मार्केटमधील कचऱ्यासाठी स्वतंत्र घंटागाडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

स्वच्छता विभागामार्फत गटार सफाई, रस्ते सफाई, कचरा संकलन व नागरिकांच्या स्वच्छतेसंदर्भातील तक्रारींचे निराकरण नियमितपणे करण्यात येते. नागरिक व लोकप्रतिनिधींकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून शक्यतो 24 तासांच्या आत तक्रारींचे निराकरण करण्यावर प्रशासनाचा नियमित भर आहे.

........................


 “घनकचरा व्यवस्थापनाच्या कामकाजात संबंधित मक्तेदाराकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. कचरा संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया, गटार सफाई व परिसर स्वच्छतेचे नियोजन योग्य पद्धतीने करून कामकाज नियमितपणे पार पाडणे आवश्यक आहे. नागरिकांना स्वच्छतेसंदर्भात तक्रारी निर्माण होणार नाहीत, यासाठी मक्तेदाराने कामकाजाचे सातत्याने निरीक्षण व व्यवस्थापन करावे. संबंधित अधिकाऱ्यांनीही कामावर नियमित देखरेख ठेवून आवश्यक त्या सुधारणा करून घ्याव्यात.


  *श्री. विवेक धांडे* मुख्याधिकारी चोपडा नगरपरिषदेचे

 

.....................

"चोपडा नगरपरिषद प्रशासन शहरातील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्यास कटिबद्ध असून, नागरिकांनीही कचरा योग्य ठिकाणी टाकून व ओला-सुका कचरा वेगवेगळा देऊन नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. 

          *वसंत राठोड* 

 स्वच्छता विभाग प्रमुख

 चोपडा नगरपरिषद चोपडा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने