आयुक्तांची तात्काळ दखल; झाडांच्या बुंध्यालगतचे काँक्रिटीकरण हटविण्याची मोहीम सुरू
नगरसेवक अरविंद देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश; झाडांना मिळाला मोकळा श्वास, पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल
जळगाव, दि. १९ (प्रतिनिधी) जळगाव शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या रस्ते, पदपथ व सार्वजनिक जागांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांदरम्यान झाडांच्या बुंध्यालगत नियमबाह्य पद्धतीने काँक्रिटीकरण करण्यात येत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून देत नगरसेवक अरविंद देशमुख यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे सविस्तर निवेदन सादर केले होते. या निवेदनात झाडांच्या मुळांना हवा, पाणी व आवश्यक पोषक घटक मिळत नसल्यामुळे भविष्यात झाडे कमकुवत होऊन मोठ्या दुर्घटना घडू शकतात, असा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. निवेदनासोबत अनेक ठिकाणांची छायाचित्रेही पुरावा म्हणून जोडण्यात आली होती.
या निवेदनाची महानगरपालिका आयुक्तांनी अत्यंत तातडीने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. आयुक्तांच्या आदेशानंतर अवघ्या काही तासांतच शहरातील विविध भागांमध्ये झाडांच्या बुंध्यालगत करण्यात आलेले काँक्रिटीकरण हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.
काल दिवसभरात अनेक ठिकाणी झाडांच्या मुळांभोवतीचे काँक्रिट काढून टाकण्यात आले. झाडांच्या बुंध्याभोवती आवश्यक त्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून भविष्यात पुन्हा काँक्रिट झाडांच्या मुळांपर्यंत जाऊ नये यासाठी विटांच्या साहाय्याने संरक्षक गोलाकार पॉकेट तयार करण्यात आले. या उपाययोजनेमुळे झाडांच्या मुळांना नैसर्गिकरीत्या हवा, पाणी आणि पोषक घटक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून झाडांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची कार्यवाही मानली जात आहे.
नगरसेवक अरविंद देशमुख यांनी आपल्या निवेदनात नमूद केले होते की, शहराचा विकास महत्त्वाचा असला तरी तो पर्यावरणपूरक असणे तितकेच आवश्यक आहे. झाडांच्या बुंध्यालगत थेट काँक्रिटीकरण केल्यास मुळे कमकुवत होतात आणि भविष्यात मुसळधार पाऊस किंवा वादळी वाऱ्यांमध्ये झाडे कोसळून मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता वाढते. मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या शहरांमध्ये घडलेल्या अनेक दुर्घटनांमध्ये अशा प्रकारच्या निष्काळजीपणाचे परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे जळगावमध्ये अशा घटना घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती.
महानगरपालिका प्रशासनाने या विषयाची तात्काळ दखल घेत प्रत्यक्ष मैदानात उतरून कार्यवाही केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. झाडांच्या संरक्षणाबाबत प्रशासनाने दाखविलेली संवेदनशीलता ही पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
यावेळी नगरसेवक अरविंद देशमुख यांनी महानगरपालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे व संबंधित कॉन्ट्रॅक्टर याचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, "प्रशासनाने जनहित आणि पर्यावरण संरक्षणाच्या विषयाची तात्काळ दखल घेऊन केलेली कार्यवाही निश्चितच कौतुकास्पद आहे. विकासकामे आवश्यक आहेत; मात्र ती पर्यावरणाला हानी पोहोचविणारी नसावीत. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे."
देशमुख यांनी पुढे सांगितले की, शहरातील उर्वरित सर्व भागांचीही पाहणी करून ज्या ठिकाणी झाडांच्या बुंध्यालगत नियमबाह्य काँक्रिटीकरण करण्यात आले आहे, त्या सर्व ठिकाणी अशीच कार्यवाही करण्यात यावी. भविष्यात कोणत्याही विकासकामात वृक्षसंवर्धनाचे निकष काटेकोरपणे पाळणे बंधनकारक करण्यात यावे आणि अशा प्रकारचा निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित अधिकारी, अभियंते व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी.
यावेळी त्यांनी "पर्यावरण बचाव मोहीम" अंतर्गत जळगावकरांना विशेष आवाहन केले. "शहरात कुठेही झाडांच्या बुंध्यालगत नियमबाह्य काँक्रिटीकरण, वृक्षतोड, पर्यावरणाला हानी पोहोचविणारी कामे किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे प्रकार आढळल्यास त्याची छायाचित्रांसह माहिती मला तात्काळ पाठवावी. नागरिकांनी एक जबाबदार जळगावकर म्हणून पुढे येऊन अशा प्रकारांची माहिती दिल्यास त्या प्रत्येक प्रकरणाचा संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून तातडीने योग्य ती कार्यवाही करून घेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. 'पर्यावरण बचाव मोहीम' ही केवळ एक मोहीम नसून जळगावचा हरित वारसा जपण्याचा, पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा आणि भावी पिढ्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ व पर्यावरणपूरक शहर उभारण्याचा सामूहिक संकल्प आहे. प्रशासन आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम केल्यासच जळगाव शहर खऱ्या अर्थाने हरित, सुंदर आणि सुरक्षित बनू शकते," असे आवाहन नगरसेवक अरविंद देशमुख यांनी केले
