गिरीश पाटील याची युनिसेफ युवाहच्या नॅशन

 गिरीश पाटील यांची युनिसेफ युवाहच्या नॅशनल युथ ॲडव्हायजरी बोर्डवर निवड

जळगाव,दि.८(प्रतिनिधी) जिल्ह्यातील वाघळुद बुद्रुक गावचे २२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ता गिरीश पाटील याची युनिसेफ युवाहच्या यंग पीपल ऍक्शन टीम २०२५–२०२६ साठी युवक प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. हा राष्ट्रीय स्तरावरील सल्लागार मंडळ देशभरातील युवकांचा आवाज राष्ट्रीय धोरण आणि कार्यक्रमांमध्ये पोहोचवण्यासाठी कार्य करते.

युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांची संस्था असून ती जगभरातील मुलांच्या व युवकांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी कार्य करते. युवाह हा युनिसेफ भारतचा युवा विभाग आहे, जो युवकांच्या नेतृत्ववृद्धी व संधीसह निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढवण्याचे काम करतो.

गिरीश हा युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया या पर्यावरण संरक्षण, सामाजिक न्याय आणि युवा विकास संबंधी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचा संस्थापक आहे. तसेच तो जल बिरादरीचा राष्ट्रीय युवा संयोजक म्हणून कार्यरत असून, भारताचे जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंग यांच्यासोबत पर्यावरण रक्षणासाठी कार्य करत आहे.

याआधी त्याने पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पात महाराष्ट्र शासनासोबत कार्य केले असून, नदी क्लब चळवळीच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणांमध्ये नदी संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करत आहे. राज्य शासनाच्या 'चला जाणूया नदीला' अभियानाकरिता तो शासकीय समितीत सदस्य देखील आहे.

गिरीश याने टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई येथून जल धोरण व प्रशासन या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. जळगाव जिल्ह्यातील युवकाला युनिसेफच्या राष्ट्रीय धोरणात्मक पातळीवर काम करण्याची संधी मिळाल्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.

"माझा उद्देश असा आहे की या संधीमार्फत, गावखेड्यांमधील, शेतकरी कुटुंबांतील आणि आदिवासी समाजातील युवकांचा आवाज राष्ट्रीय धोरणांमध्ये पोहोचवायचा आहे," असे तो म्हणाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने