कृषि सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन
शिंदखेडा दि.७(प्रतिनिधी)राज्यातील हजारो कृषि सहायकांच्या विविध मागण्यांकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष व वारंवार आश्वासने मिळूनही मागण्या पूर्ण न केल्याने अखेर महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेने दिनांक ५ मे पासून आंदोलनाचा बिगुल फुंकला आहे. तालुका कृषि अधिकारी शिंदखेडा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे संघटनेने आंदोलनाची टप्पे जाहीर केले आहेत. १० फेब्रुवारी रोजी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत १५ दिवसांच्या आत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र महिन्यानंतरही मागण्या तशाच प्रलंबित असल्यामुळे संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
प्रमुख मागण्यांमध्ये कृषि सेवक कालावधी रद्द करून नियमित कृषि सहाय्यक पदावर नियुक्ती, पदनाम बदलून सहाय्यक कृषि अधिकारी करणे, कृषि सहाय्यकांना संगणक (लॅपटॉप) उपलब्ध करून देणे, ग्रामस्तरावर कामकाजासाठी मदतनीस नियुक्त करणे यासह अनेक मागण्यांसाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनातील पहिला टप्पा ५ मे रोजी कृषि सहाय्यक यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. ६ मे रोजी सर्व शासकीय संदेशवहन व्हाट्सॲप गटांमधून बाहेर पडलेत. ७ मे आज रोजी तालुका कृषि अधिकारी शिंदखेडा कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले .८ मे रोजी एक दिवस सामूहिक रजा आंदोलन, ९ मे पासून सर्व ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार, १५ मे पासून सर्व योजनांच्या कामावर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे. धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष दिपक झाल्टे, जिल्हा प्रतिनिधी मुकेश सोनवणे, तालुकाध्यक्ष हर्षल पाटील, कार्याध्यक्ष संदीप वाघ, कोषाध्यक्ष कुमुदिनी पाटील व सर्व कृषी सहाय्यक उपस्थित होते.