धानोरा आग अग्निशमन बंबाच्या दीड तास विलंबाला जबाबदार कोण..न.प.विरोधी पक्षाचा सवाल..!
चोपडा दि.२४(प्रतिनिधी) : चोपडा शहर व तालुक्यात मागील दोन महिन्यांच्या कालावधीत बऱ्याच आगीच्या घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतबांधावर तर कुठे दिवाळीच्या फटाक्यांमुळे, तर काही ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले. वारंवार आगीच्या घटना घडत असताना नगरपरिषदेची अग्निशमन यंत्रणा कितपत सक्षम आहे, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
धानोरा येथे लागलेल्या आगीत दोन गरीब कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य, कपडे, धान्य व इतर वस्तू जळून मोठे नुकसान झाले. मात्र, आग लागल्यानंतर चोपडा नगरपरिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल दीड तासाचा विलंब झाल्याची बाब अत्यंत संतापजनक आहे. आगीच्या घटनांमध्ये प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असताना इतका विलंब होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचा संताप विरोधी पक्ष नगरसेवकांनी धानोरा घटनास्थळ भेटप्रसंगी व्यक्त केला
अग्निशमन विभागात आवश्यक संख्येने प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध नसल्याची परिस्थिती असताना नगरपरिषद प्रशासनाने या विभागाच्या सक्षमीकरणासाठी काय उपाययोजना केल्या? अग्निशमन वाहनांची उपलब्धता, प्रशिक्षित कर्मचारी, आवश्यक उपकरणे आणि आपत्कालीन संपर्क व्यवस्था यांची नियमित तपासणी केली जाते का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.केवळ ₹ १२७५ च्या बिलाअभावी नगरपरिषदेचा दूरध्वनी बंद? असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असल्याचेही स्पष्ट केले.नगरपरिषदेच्या महत्त्वाच्या सभागृहातील CCTV यंत्रणा व्यवस्थित कार्यरत नसल्यामुळे सभेतील कामकाजाचे फुटेज उपलब्ध होत खंतही त्यांनी व्यक्त केली.
घटनास्थळी उपस्थित मान्यवरांनी नुकसानग्रस्त कुटुंबांना धीर देत शासकीय स्तरावरून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. यावेळी नगरपालिका विरोधी पक्ष भाजपा गटनेता श्री गजेंद्र जैसवाल ,भाजपा ज्येष्ठ नेता स्वीकृत नगरसेवक तीलकचंद शहा , महिला मोर्चा भाजप जळगाव जिल्हाध्यक्ष तसेच चोपडा नगरसेविका सौ संध्या महाजन, समाज सेवक नरेश महाजन ,भाजपा तालुका उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र महाजन, बुथ प्रमुख विजय पाटील ,रवी महाजन, खुशाल महाजन,अमोल महाजन ,गोपाल चौधरी , खेमराज महाले आदी तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
