आजच्या युवा पिढीने मेकअप मोबाईल मध्ये न राहता शिवचरित्र आत्मसात करावे : शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे 🔴अमर संस्था चोपडा संचलित परम पूज्य साने गुरुजी आदर्श बालवाडीचा रौप्य महोत्सव उत्साहात

 आजच्या युवा पिढीने मेकअप मोबाईल मध्ये न राहता शिवचरित्र आत्मसात करावे : शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे 

🔴अमर संस्था चोपडा संचलित परम पूज्य साने गुरुजी आदर्श बालवाडीचा रौप्य महोत्सव उत्साहात 

चोपडा,दि.१ (प्रतिनिधी) विदेशातील लोकांकडे मोठ्या आदर्श व्यक्तींचा अभाव असल्यामुळे ते काल्पनिक पात्रांमध्ये रममाण होतात ,मात्र आपल्या देशात स्त्रीला मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील दैवत मानणारे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांसारखे महान आदर्श राजे लाभले आहेत. तसेच “ज्या पुण्यात जयदेवाने गाढवाचा नांगर फिरवला,त्याच पुण्यात छत्रपतींनी  सोन्याचा नांगर फिरवला.तलवारीपूर्वी नांगर हातात घेतल्यामुळेच  महाराज हे रयतेचे राजा ठरले आहेत तसेच राष्ट्रमाता जिजाऊ यांनी स्त्री,शेती व राज्यकारभाराचे संस्कार शिवरायांवर रुजवले आहेत म्हणून  आजच्या पिढीपर्यंत शिवचरित्र पोहोचणे अत्यावश्यक आहे .मुलींना  केवळ गोष्टी  सांगू नयेत शिवचरित्र आपल्या मनात खोलवर रुजवावे ते वरवरच्या मेकअपसारखे नसावे असे जोरदार प्रतिपादन शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे(धुळे) यांनी केले. 

ते अमर संस्था  संचलित बाल मोहन विद्यालयात परम पूज्य साने गुरुजी आदर्श बालवाडीच्या आयोजित रौप्य महोत्सवी  कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.नम्रता सचिन पाटील यांनी भूषविले तर  प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील  उपाध्यक्ष मनोज चित्रकथी,सचिव नितीन जोशी,व्यवस्थापक राकेश पाटील,बालमोहन प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप चौधरी, रंजना पाटील ,रेखा पाटील,बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती पाटीलआदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी  अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्षा नम्रता पाटील यांनी  संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत अण्णा यांनी लहानशा रोपटयातून वटवृक्ष उभा केला आहे या वटवृक्षाने अनेकांना उच्चस्तरीय पदापर्यंत पोहोचवले आहे यातच आपले शाळेचा नावलौकिक जिल्हाभरात पोहचला असल्याचे सांगितले.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, विद्येची देवी सरस्वती माता, परमपूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर संस्थेच्या वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व आजी-माजी शिक्षिका तसेच माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी विद्यार्थिनी राची जैन व माजी विद्यार्थी डॉ.आकाश पाटील यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.तसेच साने गुरुजी आदर्श बालवाडीच्या मुख्याध्यापिका सौ.रेखा नेवे यांनीही संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेत प्रेरणादायी मनोगत सादर केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मयुरेश्वर सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन राकेश पाटील यांनी केले. प्रसंगी बालमोहन विद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने