पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठातर्फे नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हिंदी संगोष्ठी व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न.

 पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठातर्फे नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हिंदी संगोष्ठी व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

♦️साठ विद्वानांचा ‘विद्या वाचस्पती’, ‘सारस्वत सन्मान’ देऊन देशाच्या राजधानीत गौरव 


मथुरा,दि.३ :- हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ, वृंदावन धाम (मथुरा) यांच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे भव्य राष्ट्रीय हिंदी संगोष्ठी व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

नवी दिल्लीतील पंचतारांकित रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आयोजित या भव्य कार्यक्रमात देशातील विविध प्रांतांतून आलेल्या विद्वानांना पदक, प्रशस्तीपत्र व शाल प्रदान करून ‘विद्या वाचस्पती’ तसेच ‘विद्या वारिधी सारस्वत सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.

या सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठ, झांसीचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉ. अरविंद कुमार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंदुभूषण मिश्रा ‘देवेंदु’ होते. तसेच भारतीय जनता पार्टी (छत्तीसगड) चे प्रदेश उपाध्यक्ष प्रबल प्रताप सिंह जू देव यांची विशेष उपस्थिती लाभली.

मुख्य वक्त्या म्हणून शिक्षणतज्ज्ञ व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋतु दुबे तिवारी उपस्थित होत्या. उत्तर मध्य रेल्वे, रेल्वे मंत्रालय भारत सरकारचे ZRUCC सदस्य डॉ. शिवाजी रामभाऊ शिंदे तसेच इस्पात मंत्रालय भारत सरकारचे माजी सदस्य डॉ. कुलवंत सिंह सलुजा यांचे विशेष सान्निध्य कार्यक्रमास लाभले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते मंत्रोच्चारासह दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

सन्मानित विद्वानांना मार्गदर्शन करताना मुख्य अतिथी पद्मश्री डॉ. अरविंद कुमार यांनी सांगितले की, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३४३(१) नुसार हिंदीला भारताची राजभाषा घोषित करण्यात आले आहे. संविधानात हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता देण्याचा विचार होता. हिंदी भाषेची वाढती लोकप्रियता लक्षात घेता तिला राष्ट्रभाषेचा दर्जा देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंदुभूषण मिश्रा यांनी सांगितले की, हिंदी लेखन, शिक्षणाचा विकास, पर्यावरण जनजागृती, वैद्यकीय सेवा, विधी सहाय्य व समाजसेवा या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाच्या आधारे हा सारस्वत सन्मान प्रदान केला जातो.

मुख्य वक्त्या डॉ. ऋतु दुबे तिवारी यांनी युवा पिढीने हिंदी भाषेचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन केले.

या सन्मान सोहळ्यात देशातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ, लेखक, शिक्षक, साहित्यिक व विद्वानांनी हिंदी भाषेच्या उन्नतीसाठी आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यापीठातर्फे उपस्थित मान्यवरांना स्मृतिचिन्ह व अंगवस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आचार्य जानकी बल्लभ शास्त्री यांनी केले.


........................

 *फोटो कॅफ्शन: महाराष्ट्रातील* ज्येष्ठ पत्रकार श्री. अनिलकुमार पालीवाल यांना पीएच.डी., विद्या वाचस्पती व सारस्वत सन्मान प्रदान करताना मुख्य अतिथी पद्मश्री डॉ. अरविंद कुमार, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंदुभूषण मिश्रा, समन्वयक डॉ. शिवाजी शिंदे, मुख्य वक्त्या डॉ. ऋतु दुबे तिवारी, भाजप नेते प्रबल प्रताप सिंह जू देव आदी मान्यवर.

(छाया : धनंजय धर्मसेना, रायपूर)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने